प्रतिनिधी/ बेंगळूर :
राज्यात कोरोनाच्या नोंदीत मोठी वाढ होत असतानाच रविवारी 6 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. मात्र दोघांचा बळी गेला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होत असताना एकाच दिवशी बेंगळूर आणि मंगळूरमधील दोघांचा मृत्यू झाल्याने आरोग्य खात्याला धक्का बसला आहे. राज्यात आतापर्यंत 390 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 111 संसर्गमुक्त झाले आहेत. तर 16 जण दगावले आहेत.
आरोग्य खात्याने सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटीनमधील माहितीनुसार शनिवारी सायंकाळी 5 पासून रविवारी सायंकाळपर्यंत राज्यात कोरोनाच्या 6 नव्या प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यापैकी म्हैसूर जिल्हय़ात 4 तसेच मंगळूर जिल्हय़ात 2 रुग्ण आढळून आले आहेत. समाधानाची बाब म्हणजे कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या बेंगळूर, धारवाड, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा या जिल्हय़ांमध्ये रविवारी नवे रुग्ण आढळले नाहीत.
मंगळूर जिल्हा संसर्गमुक्त होत असतानाच रविवारी या या जिल्हय़ात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. तर बेंगळूरमध्येही 65 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 15 वर पोहोचली आहे. मंगळूर जिल्हय़ाच्या बंटवाळ येथील 50 वर्षीय महिलेला श्वसनासंबंधी विकारामुळे शनिवारी वेनलॉक इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत असताना स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. हा अहवाल येण्यापूर्वीच रविवारी सकाळी 9.15 वाजता तिचा मृत्यू झाला. सायंकाळी तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तिचा पती आणि मुलाला क्वारंटाईनमध्ये हलविण्यात आले आहे.
मंगळूर जिल्हय़ात आतापर्यंत 11 जण कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 10 जण संसर्गमुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील जनतेतील भीती दूर झाली होती. पण रविवारी एका महिलेचा मृत्यू झाल्याने जनतेत पुन्हा भीतीचे सावट निर्माण झाले आहे. याच जिल्हय़ातील उप्पीनंगडी येथे 30 वर्षीय महिलेला तिच्या पतीमुळे संसर्ग झाला आहे. बेंगळूरमध्ये 65 वर्षीय महिलेवर राजीव गांधी इस्पितळात उपचार सुरू होते. रविवारी सकाळी तिचा देखील मृत्यू झाला आहे.
म्हैसूर, नंजनगूडमध्ये 2 नवे रुग्ण
म्हैसूर शहरात आणि नंजनगूडमध्ये प्रत्येकी 2 नव्या रुग्णांची भर पडली आहे. म्हैसूरमध्ये 46 वर्षीय पुरुष आणि 20 वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. ते दोघेही दिल्लीतील तबलिग जमातच्या धार्मिक सभेत सहभागी झाले होते. तर नंजनगूडमध्ये 39 वर्षीय युवक आणि 23 वर्षीय युवतीला संसर्ग झाला आहे. येथील ज्युबिलीयंट फार्मा कंपनीतील संसर्गबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.