मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती : रुग्णांमध्ये बाहेरुन आलेले 31 गोमंतकीय : 4 परप्रातीयांचा समावेश
महत्वाचे निर्णय-अटी-कारवाई
- तिसऱया लॉकडाऊनच्याच अटी 31 मे पर्यंत
- कर्नाटकातून येणारे पास काढून येऊ शकता
- आतापर्यंत गोव्यात तीन हजार लोक दाखल
- येणाऱयांना तपासणी व विलगीकरण रु. 2000 शुल्क
- इटलीत अडकलेले 441 खलाशी शनिवारी गोव्यात
- मास्क, थुंकीप्रकरणी 18300 जणांवर कारवाई
- कमी केलेल्या कामगारांचे माहिती संकलन सुरु
प्रतिनिधी / पणजी
दहावीची परीक्षा ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. तिसऱया लॉकडाऊनमधील नियम, अटी 31 मे पर्यंतच्या चौथ्या लॉकडाऊनमध्ये कायम रहाणार आहेत. राजधानी एक्स्प्रेस (दिल्ली – गोवा) मडगाव स्टेशनचा थांबा बंद करण्यात आला आहे. राज्यात सध्या एकूण 35 कोरोनाबाधीत रुग्ण आहेत. आपापल्या राज्यात जाण्यासाठी सुमारे दीड लाख कामगारांनी नोंदणी केली असून आतापर्यंत सुमारे 10 हजार 500 जणांची परत पाठवणी केल्याचीही माहिती त्यांनी दिली.
आल्तिनो पणजी येथील सरकारी निवासातून ऑनलाईन पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी त्यांनी वरील माहिती त्यांनी दिली.
कर्नाटकातून पास काढून येऊ शकता
गोव्यातील लॉकडाऊनमध्ये नव्याने कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मागील व सध्याचे लॉकडाऊनच जसेच्या तसे पुढे चालू रहाणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटकातून गोव्यात आंतरराज्य बससेवा चालू करण्यास अनुमती नाही. कोणाला गोव्यात यायचे असेल तर पास काढून येऊ शकतात, असेही डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
कोरोनाचे सर्व 35 रुग्ण आयात केलेले
कोरोनाचे एकूण रुग्ण 35 असून ते सर्वजण आयात केलेले (बाहेरून आलेले) आहेत. त्यातील 31 गोमंतकीय असून चार इतर राज्यातील आहेत. कोरोनाचे गोव्यात सामाजिक प्रसारण झालेले नाही आणि होणारही नाही. त्या सर्व रुग्णांना गोव्यात आल्यानंतरच अडवण्यात येऊन त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. पॉझिटिव्ह सापडले त्यांना हॉस्पिटलात पाठवले व इतरांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आतापर्यंत गोव्यात तीन हजार लोक दाखल
कोरोना तपासणी व हॉटेल विलगीकरण खर्च मिळून रु. 2000 शुल्क हे गोव्यात येणाऱया सर्वांनाच द्यावे लागणार आहे. गोव्यात एकूण 3000 लोक आतापर्यंत आले असून त्यातील 700 जण हे रेल्वेने गोव्यात पोहचले तर बाकीचे उर्वरित मार्गाने आले, अशी माहिती त्यांनी दिली.
इटलीत अडकलेले 441 खलाशी शनिवारी गोव्यात
मास्क घातला नाही म्हणून 11500 जणांना तर सार्वजनिक ठिकाणी थुंकले म्हणून 6800 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. इटली देशात अडकून पडलेले सुमारे 441 खलाशी शनिवारी 3 विमानातून गोव्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कमी केलेल्या कामगारांचे माहिती संकलन सुरु
लॉकडाऊनमध्ये ज्या कामगारांना कामावरून कमी केले असेल त्यांची माहिती गोळा करण्याचे काम कामगार आयुक्तांना देण्यात आले आहे. कामगार निरीक्षक सर्व उद्योगांना भेटी देऊन तपशील गोळा करतील, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
दहावी-बारावीची परीक्षा वेळापत्रकानुसार होणार
दहावीची परीक्षा वेळापत्रकानुसार होणार आहे. प्रत्येक वर्गात फक्त 12 विद्यार्थ्यांना परवानगी आहे. राज्यभरात 2563 वर्गांमधून ही परीक्षा घेतली जाणार आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील गोव्याच्या सीमेपलीकडे असलेल्या परीक्षार्थीना तेथेच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. सर्व ते नियम अटी पाळून परीक्षा होणार आहेत. दहावीची परीक्षा रोखण्याचा प्रयत्न अनेकांनी चालवला असून काहीजण कोर्टातही गेले. परंतु कोर्टानेही त्यांचे म्हणणे फेटाळून लावले व स्थगिती देण्यास नकार दर्शवला. आता परीक्षेला कोणतीही अडचण नाही, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
रेल्वे बंद करा, अन्यथा रुळांवर उतरणार : भाजप आमदार, मंत्र्यांच्या बैठकीत इशारा
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात येणाऱया सर्व रेल्वे त्वरित बंद करा, अशी जोरदार मागणी भाजप आमदार, मंत्री यांच्या बैठकीतून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे करण्यात आली आहे.
राजधानी एक्स्प्रेसचा गोव्यातील मडगाव थांबा बंद करण्यात आला असून निजामुद्दीन एक्स्प्रेस ही एकच रेल्वेगाडी गोव्यातून जाणार आहे, असा खुलासा डॉ. सावंत यांनी केला, त्यावर कोणीच समाधानी झाले नाही. गोव्यात एकही रेल्वे येता कामा नाही, असा सूर सर्वांनी लावला आणि त्या रेल्वे बंद झाल्या नाहीत तर आमदारांना त्या रुळावर उतरून बंद कराव्या लागतील, असा इशारा भाजपच्या मंत्री, आमदार बैठकीतून देण्यात आला आहे.