प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोना नियंत्रणात येत आहे. बुधवारी राज्यात 1,63,962 कोविड चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांची संख्या वाढवून देखील पॉझिटीव्ह अहवाल येण्याचे प्रमाण 6.68 टक्क्यांवर आले आहे. मागील दोन महिन्यातील हा अत्यंत कमी दर आहे. मागील चोवीस तासांत राज्यात 10,959 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात बुधवारी दिवसभरात 20,246 जण कोरोनामुक्त झाले तर 192 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूचे प्रमाण कमी झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 3,10,26,189 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 27,28,248 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर एकूण 24,80,411 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत एकूण 32,291 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.