बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दररोज वाढणारी कोरोनाची संख्या प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी सरकार सज्ज आहे. यासाठी सरकारने तसे आदेशही जारी केले आहेत. राज्यात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कोरोनाची संख्या वाढली. मंगळवारी राज्यात बाधितांची संख्या २ हजाराच्या पुढे गेली होती. आता बुधवारी तीच संख्या २,२०० च्या पुढे गेली आहे.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात बुधवारी २,२९८ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, राज्यातील विविध जिल्ह्यातून ९९५ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. बुधवारी कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. वाढती कोरोना रुग्णांची संख्या राज्याची चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे सरकार राज्यात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेणार का? याकडे लक्ष आहे.
दरम्यान राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. बेंगळूरमध्ये प्रशासन कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियमावली राबवित आहे. जिल्ह्यात प्रशासनाने अनेक कार्यक्रमांवर मर्यादा आणली आहे. दरम्यान मंगळवारी जिल्ह्यात १,२८० नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. दरम्यान बुधवारी तीच संख्या १,३९८ वर पोहोचली. तर ६३७ रुग्ण कोरोनावर मत करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,५६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.