रविवारी तब्बल 388 नवीन रुग्ण : एका बळीची नोंद.बरे होणाऱयांची संख्या कमी,लागण होणाऱयांची संख्या अनेक पटीनी जास्त
प्रतिनिधी /पणजी
गेव्यात गेल्या 24 तासात म्हणजे रविवारी कोरोनाचे 388 नवीन रुग्ण सापडले असून 1 बळीची नोंद झाली आहे. बरे होणाऱयांची संख्या कमी आणि लागण होणाऱयांची संख्या त्यापेक्षा अनेक पटीनी जास्त दिसत असून कोरोना संसर्गाचा दर 10 टक्क्यापेक्षा जास्त झाला आहे.
राजधानी पणजी आणि मडगाव या दोन प्रमुख शहरातील कोरोना रुग्णसंख्येने 200 चा पल्ला पार केला असून पर्वरीतील रुग्णसंख्या शतकाच्या उंबरठय़ावर आहे. कासावली आणि कुठ्ठाळी या दोन आरोग्य केंद्रातील रुग्णसंख्या 100 च्या पुढे गेली आहे.
अचानक वाढत असलेल्या या कोरोना संसर्गामुळे जनतेमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातारवण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येने 1500 टप्पा पार केला असून ती 1671 झाली आहे. एका बळीमुळे एकूण मृतांचा आकडा 3523 वर पोहोचला आहे. वेगाने वाढणाऱया या कोरोना संसर्गामुळे गोवा राज्यात तिसरी लाट आली की काय? अशी शंका जनतेमध्ये प्रकट होताना दिसत आहे.
मुलांना शाळेत पाठवायचे की नाही?
नाताळच्या सुट्टीनंतर आज सोमवार 3 जानेवारीपासून शाळा, कॉलेज, विद्यापीठातील शिकवणी वर्ग पुन्हा एकदा प्रत्यक्ष हजेरीत सुरू होत असून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुलांना शाळा, कॉलेजात व परीक्षेसाठी पाठवायचे की नाही? असा प्रश्न पालक वर्गासमोर उभा ठाकला आहे.
गोव्यात आतापर्यंत मिळून एकूण 181570 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 176376 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 4 जणांना हॉस्पिटलात भरती करण्यात आले तर 1 रुग्णास तेथून घरी पाठवण्यात आले 384 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.
कोरोनामुक्त केंद्रांमध्ये पुन्हा रुग्ण
कासारवर्णे, मये, शिरोडा, मडकई ही आरोग्य केंद्रे गेले काही दिवस कोरोना रुग्णांपासून मुक्त झाली होती. तेथे पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे ः डिचोली – 18, सांखळी – 11, पेडणे – 23, वाळपई – 15, म्हापसा – 87, पणजी – 201, हळदोणा – 24, बेतकी – 10, कांदोळी – 62, कासारवर्णे – 1, कोलवाळ – 17, खोर्ली – 26, चिंबल – 71, शिवोली – 64, पर्वरी – 95, मये – 4, कुडचडे – 29, काणकोण – 22, मडगाव – 211, वास्को – 72, बाळ्ळी – 37, कासावली – 144, चिंचिणी – 58, कुठ्ठाळी – 111, कुडतरी – 39, लोटली – 64, मडकई – 1, केपे – 25, सांगे – 14, शिरोडा – 7, धारबांदोडा – 3, फोंडा – 65, नावेली – 36. शिवाय विविध मार्गाने गोव्यात आलेल्या 4 पर्यटकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
जलद कृती समितीच्या आजच्या बैठकीकडे लक्ष
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे जलद कृती समितीची (टास्क फोर्स) आज सोमवार 3 जानेवारी रोजी बैठक घेवून तज्ञ समितीच्या शिफारशी कोरोना याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री, सरकार काय निर्णय घेते याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. तज्ञ समितीने शिफारशी करून देखील सरकारने त्याची दखल घेतली नाही अशी टीकाही जनमानसात प्रकट होत आहे.
कोरोना टेबल
- 2 जानेवारीपर्यंतचे एकूण रुग्ण 181570
- बरे झालेले रुग्ण 176376
- सक्रीय कोरोना रुग्ण 1671
- 2 जानेवारीचे नवीन रुग्ण 388
- बरे झालेले रुग्ण 54
- कोरोना बळी 1
- आतापर्यंतचे एकूण बळी 3523