प्रतिनिधी / पणजी
काही दिवसांवर गणेशचतुर्थी आली असल्याने राज्यात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. कोरोना महामारीचा काळ असूनही चतुर्थी साजरी करण्याचा उत्साह लोकांमध्ये दिसून येत आहे. याशिवाय बहुतांश लोकांकडे दीड दिवसाचे गणपती असले तरी घराची रंगरंगोटी, सजावट, पताका लावणे, करंज्या करणे यासारखी कामे गतीने होत आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काहीजण ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय निवडत आहेत. याचबरोबर राज्य सरकारने घातलेल्या अटी आणि शर्तींमुळे गणेशोत्सवाच्या आयोजनावर संकट ओढवले आहे.
बाजारपेठेत चतुर्थीच्या सजावटीसाठी लागणाऱया सर्वप्रकारच्या वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. परंतु दरवर्षीप्रमाणे खरेदीला कमी प्रतिसाद मिळत आहे. लोक मॉल, सुपरस्टोअरमध्ये न जाता दुकानांवर यादी देऊन घरपोच सेवा किंवा नंतर आणण्यावर जास्त भर देत आहेत. दरवर्षी कपडे, व इतर सामान खरेदी करण्यासाठी बाजारात लोकांची झुंबड उडत असे. परंतु यंदा लोकांनी अत्यावश्यक वस्तूंचीच खरेदी करून अव्याढव्य खरेदी खर्चावर निर्बंध आणले आहेत.
गोव्यात नवीन लग्न झालेल्या मुलींना माहेरून ‘ओझे’ दिले जाते. या ओझ्यासाठी लागणाऱया वस्तूंच्या खरेदीसाठी दरवर्षी पणजीत अष्टमीची फेरी भरते. परंतु यंदा कोरोनामुळे अष्टमीची फेरी भरणार नसल्याने ओझ्यासाठी लागणाऱया वस्तू पाट, लाकडी माटोळी आदी खरेदी करण्यासाठी तारांबळ उडाली आहे. पणजीतील अष्टमीच्या फेरीत अशाप्रकारच्या वस्तू खरेदी करण्याची एक पर्वणी मानली जायची. त्यामुळे सदर साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांची धावपळ सुरू आहे.
अष्टमीची फेरी नसली तरीही पणजीत माटोळी बाजार दरवर्षीप्रमाणे भरला जाणार आहे. परंतु यंदा मास्क आणि कडक सामाजिक अंतर पाळूनच सदर बाजार भरविण्यात येणार आहे. पणजी महानगरपालिकेकडून हा माटोळी बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मांडवी किनारी दि. 19 ऑगस्ट पासून माटोळी बाजार भरविण्यात येणार आहे. सदर माटोळी बाजार दि. 21 रोजीपर्यंत सर्वांसाठी खुला असेल.
गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे संकट आहे. दुसरीकडे कोरोनामुळे अनेकांची नोकरी गेली असली तरीही बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात करत आहेत. बाजारात सजावटीच्या वस्तू, उपरण्यापासून ते विविधरंगी फुलांच्या आर्टिफिशल माळा, विविध रंगांचे कागद, रांगोळय़ा अशा अनेक प्रकारच्या वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी बाजार हळूहळू सजत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सजावटीच्या वस्तू बाजारात आल्या तरी फटाक्यांची अजून चाहूलही बाजारात झाली नाही. परंतु येत्या दोन दिवसात फटाके बाजारात येतील अशी शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.