प्राध्यापक भरतीसाठी करणार आंदोलन, ५० हून अधिक संघटना होणार सहभागी,रिपब्लिकन स्टुडंट युनियन’चा पाठिंबा : अमोल वेटम
प्रतिनिधी / सांगली
राज्यात जवळपास १३००० हजार हून अधिक प्राध्यापक, सहा. प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. प्राध्यापक भरतीसाठी पुणे, नागपूर येथे १९ जुलै रोजी आंदोलन होणार असून, रिपब्लिकन स्टुडंट युनियनसह ५० हून अधिक संघटना यात सहभागी होणार असल्याची माहिती रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे संघटना सांगलीचे प्रमुख अमोल वेटम यांनी दिली.
राज्यात १३००० हून अधिक प्राध्यापक, सहा. प्राध्यापक यांची पदे रिक्त आहेत. उच्च शिक्षण मंत्री केवळ तोंडी आश्वासन देतात, पण निर्णय मात्र जाहीर करत नाहीत. यामुळे उच्च शिक्षित बेरोजगार तरुणांवर अन्याय होत आहे. महाराष्ट्रात एकूण ६८ विद्यापीठ, ४ हजार ४१४ महाविद्यालय आणि २ हजार ३९३ स्वतंत्र संस्था आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, पशुसंवर्धन, विधी, कला, वाणिज्य, शिक्षणशास्त्र आदी विविध कोर्सेसमध्ये जवळपास ३४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
राज्यातील सर्व अनुदानित महाविद्यालयातील रखडलेली प्राध्यापक, सहायक प्राध्यापक भरती प्रक्रियेबाबत शासन निर्णय तात्काळ जाहीर करावा व इतर अनुषंगिक मागण्यासाठी पुणे व नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे १९ जुलै रोजी बेमुदत आंदोलन छेडण्यात येणार आहे. जवळपास ५० हून अधिक संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत. राज्यातील अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठातील प्राध्यापक, सहा. प्राध्यापकांच्या सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, प्राध्यापक भरतीसाठी प्रचलित विषय व विभाग निहाय आरक्षण धोरण कायम ठेवण्यात यावे, अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठातील शिक्षक संवर्गातील राखीव जागांचा अनुशेष प्रचलित १०० बिंदुनामावली नुसार तात्काळ भरण्यात यावा, तासिका तत्वावरील अर्थात सीएचबी तसेच कंत्राटी धोरण कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, तासिका तत्त्वावरील कामाचा अनुभव कायमस्वरुपी सेवेत समाविष्ट झाल्यानंतर ग्राह्य धरण्यात यावा, राज्यातील सर्व विनाअनुदानीत महाविद्यालयांना त्वरीत अनुदान देण्यात यावे. एमपीएससी मधून सहा. प्राध्यापक, असोसिएट प्राध्यापक भरती तात्काळ करा, आदी मागण्याबाबत आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे माहिती वेटम यांनी दिली.