चक्रिवादळाचा परिणाम, पुढील दोन दिवस गडगडाटासह पावसाची शक्यता
प्रतिनिधी/ पणजी
तामिळनाडूत सुरु झालेल्या चक्रिवादळाचा फटका अखेर अपेक्षेप्रमाणे गोव्याला बसला. गोव्यात पहाटेपासून विविध भागात सुरु झालेल्या पावसाने सायंकाळी बराच जोर धरला. राजधानी पणजीसह गोव्यातील सर्व भागात सायंकाळी उशिरा जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.
हवामान खात्याने दि. 9 डिसेंबरपासून पावसाची शक्यता व्यक्त केली होती. प्रत्यक्षात मात्र दि. 11 रोजीच पाऊस सुरु झाला. हवामान खात्याने नव्याने दिलेल्या माहितीनुसार, आता अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून कदाचित त्याचे चक्रिवादळातही रुपांतर होऊ शकते. परंतु, अधिकृत अशी माहिती ही ढगांच्या हालचालींवर अवलंबून राहाणार आहे. गोव्यात मात्र रविवारी सुरु झालेला पाऊस पुढील चार दिवस राहणार आहे व काही भागात तुरळक तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पुढील दोन – तीन दिवसांत वीजांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
मोपा येथेही पाऊस!
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते आणि उद्घाटन समारंभ चालू असतानाच बाहेर पाऊस चालू होता. मात्र या समारंभासाठी उभारण्यात आलेला हँगर तथा तंबू हा चांगला होता त्यामुळे पावसाची जाणीव देखील झाली नाही. तथापि, बाहेर उभ्या असलेल्या लोकांवर पावसाचा परिणाम झाला. कार्यक्रम संपेपर्यंत पाऊस थांबला खरा व नंतर 7.30 नंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला.
वाळपई, सांखळी, फोंडा, जुने गोवे, मडगाव, काणकोण, पणजी, म्हापसा, पेडणे, सांगे येथे सायंकाळी जोरदार पाऊस पडला. सर्वात जोरात पाऊस पर्वरी भागात पडला. पणजीमध्ये सायंकाळी उशिरा पावसाचा जोर वाढला व नंतर त्याने विश्रांती घेतली. आजही गोव्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे.