मुंबईतून परतलेले ठरताहेत कोरोनाग्रस्त : मंडय़ा जिल्हय़ात 24 तासांत 71 रुग्णांची भर : मृतांचा आकडा 40 वर
प्रतिनिधी/ बेंगळूर
मागील दोन आठवडय़ापासून परप्रांतात गेलेले कर्नाटकातील हजारो जण परतले आहेत. मात्र त्यांच्यामुळे कर्नाटकात जीवघेण्या कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात होत आहे. मंगळवारी राज्यात कोरोनाचे तब्बल 149 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आणखी चिंतेची बाब म्हणजे 113 जण आंतरराज्य प्रवास केलेले आहेत. त्यातील 71 रुग्ण एकटय़ा मंडय़ा जिल्हय़ातील आहेत. दरम्यान मागील 24 तासांत कोरोनाचे तीन बळी गेले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा 40 वर गेला आहे. तर रुग्णसंख्या 1395 वर पोहोचली आहे.
कर्नाटकात कोरोनावर नियंत्रण आणण्यात राज्य सरकार यशस्वी ठरत असतानाच प्रामुख्याने मुंबईहून आलेले अनेक जण कोरोनाचे पॉझिटिव्ह आढळत आहेत.इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकात कोरोनाचा फैलाव मे च्या पहिल्या आठवडय़ापर्यंत अत्यंत कमी होता. जसजसे परप्रांतात कामानिमित्त गेलेले स्थलांतरित कामगार कर्नाटकात परतण्यास सुरूवात झाली तसतसे त्यांच्यापैकी अनेक जणांमध्ये कोरोनाचे विषाणू आढळून येत आहेत. मागील आठवडाभरात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी 60 टक्क्यांपेक्षा अधिक जण मुंबईहून परतलेले आहे. मागील 24 तासांत सुमारे 149 नवे कोरोनाबाधित आढळले. एकाच दिवशी राज्यात इतक्या प्रमाणात रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या 1,395 वर पोहोचली आहे. सोमवारी दिवसभरात 99 रुग्ण आढळून आले आहेत.
मंगळवारी मंडय़ा जिल्हय़ात 71, दावणगेरेत 22, गुलबर्ग्यात 13, शिमोगा 10, बेंगळूर शहर 6, बागलकोट 5, कारवार व उडुपी जिल्हय़ात प्रत्येकी 4, हासनमध्ये 3, चिक्कमंगळूरमध्ये 2, गदग, यादगिर, विजापूर, बिदर, रायचूर आणि चित्रदुर्ग जिल्हय़ात प्रत्येकी 1 नवा कोरोना संसर्गबाधित रुग्ण आढळून आला आहे.
मंडय़ा जिल्हय़ाने बेंगळूरला टाकले मागे
मंडय़ा जिल्हय़ात मंगळवारी एकाच दिवशी सुमारे 71 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या जिल्हय़ातील रुग्णसंख्या 160 वर पोहोचली आहे. बेंगळूर शहर जिल्हय़ात आतापर्यंत 251 रुग्ण आढळून आले असले तरी सध्या येथे 114 जणांवर उपचार सुरू आहेत. तर मंडय़ा जिल्हय़ात 139 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या जिल्हय़ात रुग्णसंख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
दावणगेरे आणि गुलबर्गा जिल्हय़ातही कोरोनाने थैमान घातले असून या जिल्हय़ातील रुग्णसंख्या अनुक्रमे 112 आणि 127 वर पोहोचली आहे. शिमोगा जिल्हय़ात एकाच दिवशी 10 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे येथील रुग्णसंख्या 24 वर पोहोचली आहे.
तिघांचा बळी : मृतांची संख्या 40 वर
मागील 24 तासांत राज्यात कोरोनाचे तीन बळी गेले आहेत. विजापूरमध्ये 65 वर्षीय वृद्धाचा सोमवारी इस्पितळात आणताना मृत्यू झाला होता. त्याच्या स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. बेंगळूरमध्ये 54 वर्षीय पुरुषाचा सोमवारी उपचारादरम्यान उपचार झाला आहे. बळ्ळारीत 61 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तापामुळे ती इस्पितळात दाखल झाली होती. अलिकडेच तिच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली होती.