बुधवारी 116 बाधितांचा बळी : 6,412 जण कोरोनामुक्त
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून दिवसभरात आढळणाऱया रुग्णसंख्येने 23 हजारांचा आकडा पार केला आहे. राज्याची राजधानी बेंगळूरमध्ये देखील रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असून दिवसभरात 13 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात बुधवारी दिवसभरात 23,558 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 6,412 जण कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान, मागील चोवीस तासांत 116 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात आतापर्यंत 12,22,202 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 10,32,233 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत एकूण 13,762 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या सक्रिय रुग्णसंख्या 1,76,188 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांत राज्यात विक्रमी 1,52,281 कोविड चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण बुधवारी 15.47 टक्के इतके होते.
बेंगळूर शहर जिल्हय़ात आतापर्यंत एकूण 5,83,675 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर मागील बुधवारी येथे 13,640 जण पॉझिटिव्ह आढळून आले. सध्या या जिल्हय़ात 1,24,894 सक्रिय रुग्ण आहेत. तर मागील चोवीस तासांत येथे 70 जण कोरोनामुळे दगावले आहेत. बेंगळूरमध्ये आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 5,382 वर पोहोचली आहे.
कोरोना मृतदेहांवर मालकीच्या शेतात अंत्यसंस्काराची मुभा
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच बाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर त्याच्या मालकीच्या खुल्या जागेत किंवा शेतात अंत्यसंस्कार करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्य सरकारने बुधवारी यासंबंधीचा आदेश जारी केला. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधिताच्या कुटुंबीयांना त्यांच्या इच्छेनुसार पार्थिवावर अंत्यसंस्कार करता येणार आहेत. मात्र, त्यासाठी यापूर्वी जारी केलेल्या मार्गसूचींचे पालन करावे लागणार आहे. अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होणाऱयांना पीपीई किट परिधान करणे तसेच सॅनिटायझिंग करणे बंधनकारक असणार आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना मृतदेहाला स्पर्श करणे किंवा आलिंगन देता येणार नाही.