आतापर्यंत 3,440 रुग्ण बरे झाले : शुक्रवारी 7 बाधितांचा मृत्यू : दिवसभरात 271 नव्या रुग्णांची भर
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाचे रुग्ण संसर्गमुक्त होण्याचे प्रमाण वाढले असतानाच आठवडाभरापासून मृतांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. शुक्रवारी एकाच दिवशी 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये बेंगळूर शहर जिल्हय़ातील 4, गुलबर्ग्यातील 2 आणि हासनमधील एकाचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात 464 जण बरे झाले. त्यामुळे संसर्गमुक्त होणाऱयांची संख्या 3,440 इतकी झाली आहे. तर 271 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 6,516 वर पोहोचली आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने शुक्रवारी सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात मागील 24 तासांत 271 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 6,516 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 2,995 सक्रिय रुग्ण आहेत. म्हणजेच 50 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त होऊन इस्पितळातून घरी परतले आहेत.
शुक्रवारी बळ्ळारी जिल्हय़ात 97, बेंगळूर शहर जिल्हय़ात 36, उडुपी 22, गुलबर्गा 20, धारवाड 19, मंगळूर 17, बिदर 10, हासन व म्हैसूर जिल्हय़ात प्रत्येकी 9, तुमकूर 7, शिमोगा 6, रायचूर व कारवारमध्ये प्रत्येकी 4, चित्रदुर्ग व रामनगरमध्ये प्रत्येकी 3, मंडय़ा 2 तसेच बेळगाव, विजापूर, यादगिरमध्ये प्रत्येकी 1 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यापैकी 92 जण परराज्यातून तर 14 जण विदेशातून कर्नाटकात आले आहेत.
बेंगळूरमध्ये 61 वर्षीय महिला, 65 वर्षीय वृद्धा, 52 वर्षीय पुरुष आणि 49 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या सर्वांचा इस्पितळात दाखल झालेल्या 4 दिवसांच्या आत मृत्यू झाला आहे. त्यामुळे बेंगळूरमधील कोरोना बळींची संख्या 27 वर पोहोचली आहे. गुलबर्ग्यात 53 आणि 48 वर्षीय पुरुषांचा बळी गेला आहे. हासनमध्ये 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. हा जिल्हय़ातील पहिला बळी आहे.
आत्महत्या केलेला युवक कोरोना पॉझिटिव्ह
बेंगळूरच्या नायंडनहळ्ळी येथील उड्डाण पुलावरून उडी मारून आत्महत्या केलेला युवक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तो वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टी वसाहतीमध्ये आणि मृतदेह वाहून नेलेल्या पोलिसांमध्ये भीती पसरली आहे. एकतर्फी प्रेमातून आठवडय़ापूर्वी एका युवकाने बेंगळूर-म्हैसूर रोडवरील नायंडनहळ्ळी येथील पुलावरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी स्वॅब तपासणी करण्यात आली होती. त्याचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. युवकाच्या प्राथमिक संपर्कात आलेल्यांना आणि अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे.
शिमोग्यात स्वामीजींना कोरोना
राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी असलेल्या राज्यांमध्ये देखील परराज्यातून आलेल्यांमध्ये बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामध्ये शिमोगा जिल्हय़ाचाही समावेश आहे. शिमोगा शहरातील एका मठाच्या स्वामीजींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी शहरातील मेग्गॉन इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. स्वामींजीना कोरोनाची लागण कशी झाली, याबाबत अद्याप समजलेले नाही. त्यांनी केलेल्या प्रवासाची माहिती पोलीस जमा करीत आहेत. सतर्कता म्हणून मठ सील करण्यात आले आहे.
जिंदालमधील 10 हजारहून अधिक कामगार क्वारंटाईन
बळ्ळारी जिल्हय़ातील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या तोरणगल (ता. संडूर) येथील जिंदाल स्टील कारखान्यातील 10 हजारहून अधिक कामगारांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. बळ्ळारी जिल्हाधिकारी एस. एस. नकुल यांनी दिलेल्या सूचनेवरून जिंदाल समूहाने निर्णय घेतला आहे. मागील तीन दिवसात जिंदाल स्टील कारखान्यातील 86 कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून बळ्ळारी तालुक्यातील 1793, संडूर तालुक्यातील 503, होस्पेट तालुक्यातील 989, तोरणगल व परिसरातील खेडय़ांमधील 4,262 कामगार तसेच जिंदाल टाऊनशिपमध्ये वास्तव्य करणाऱया 3,207 असे एकूण 10,751 कामगारांना शुक्रवारपासून पुढील 14 दिवसांपर्यंत क्वारंटाईन करण्यात आले आहे.