विधानपरिषदेत सदस्यांची मागणी : पशूसंगोपनमंत्री प्रभू चौहान यांचे आश्वासन
प्रतिनिधी / बेंगळूर
दूध उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रतिलिटर दूध खरेदीच्या दरात वाढ करावी, अशी मागणी बुधवारी विधानपरिषदेत करण्यात आली. सदस्य गोविंदराज यांनी जनावरांची देखभाल व पशूखाद्याचे दरही वाढले आहेत. परंतु, खर्चाच्या तुलनेत दुधाला दर मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.
सदस्य कोविंदराज यांच्या प्रश्नावर उत्तर देताना पशूसंगोपनमंत्री प्रभू चौहान यांनी, दूध उत्पादक महामंडळ वेळोवेळी दूध दरवाढ करत आले आहे. सरकार प्रतिलिटर 5 रुपये प्रोत्साहनधन देत आहे. जुलै 2020 पासून दूध खरेदी किमतीत वाढ करण्यात आल्याची जिल्हानिहाय माहिती दिली.
आपण स्वतः दुभती जनावरे पाळलेली आहेत. त्यांच्या देखभालीचा खर्च वाढला आहे. दूध खरेदीचा दरही वाढवावा, असा सल्ला विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी दिला. यावर सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन मंत्री प्रभू चौहान यांनी दिले. आंध्रप्रदेश, तेलंगणमध्ये दूध खरेदी दर 43 रुपये ते 47 रुपये प्रतिलिटर इतका आहे. आपल्याकडे 22 रु. ते 30 रु. इतका दर आहे. तो वाढविण्याची मागणी सातत्याने होत आहे. याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.