मंत्री डॉ. के. सुधाकर ; गुलबर्गा येथे पत्रकारांशी साधला संवाद
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात दोन एम्स स्थापन करण्याची मागणी राज्य सरकारकडून केंद्राकडे करण्यात आली आहे. कल्याण कर्नाटक भागासाठी एम्स आले तर फायद्याचे ठरणार आहे. मात्र, केंद्र सरकार कोणता निर्णय घेईल ते पहावे लागणार आहे. राज्यातील 17 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचा एम्सच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे, असे मंत्री के. सुधाकर यांनी सांगितले. गुलबर्गा येथे राजीव गांधी आरोग्य विज्ञान विश्वविद्यालय प्रादेशिक केंद्राच्या बांधकामाचा शुभारंभ करून ते पत्रकारांशी बोलत होते.
कल्याण कर्नाटक व उत्तर कर्नाटक भागासाठी प्रत्येकी 1 एम्स स्थापन करण्याची आपली मागणी आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. शनिवारी कोरोनाबाबत नवी मार्गसूची जारी केली असून गुलबर्गा जिल्हय़ालाही सीमा असून याठिकाणीही मार्गसूचीचे पालन करणे आवश्यक आहे. बाहेरील राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सोमवारपासून कठोर उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे. राज्यात लॉकडाऊनबाबत कोणताच प्रस्ताव नसल्याचे त्यांनी सांगितले. आरक्षणासाठी पंचमसाली समाज बांधव आंदोलन करत आहेत. मात्र, आरक्षणाबाबत कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कायदा तज्ञांच्या अहवालानुसार न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही मंत्री सुधाकर म्हणाले.