मागील 24 तासांत 44 नवे रुग्ण : संसर्गबाधितांची संख्या 359 वर
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना व्हायरचा कहर सुरूच असून राज्यात शुक्रवारी 44 नवे रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसात इतक्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुरुवारी 36 नवे रुग्ण आढळले होते. शुक्रवारी यापेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जनतेत भीतीची छाया आणखी गडद झाली आहे. राज्यात आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या 359 वर पोहोचली आहे.
आरोग्य खात्याने शुक्रवारी सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटीनद्वारे ही माहिती उपलब्ध झाली आहे. म्हैसूरमध्ये 12, बेंगळूरमध्ये 10, बळ्ळारी 7, बेळगाव 5, मंडय़ा आणि चिक्कबळ्ळापूरमध्ये प्रत्येकी 3, विजापूर 2 तसेच बिदर आणि मंगळूर जिल्हय़ात प्रत्येकी 1 असे एकूण 44 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
राज्यात आतापर्यंत 88 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. तर 13 जणांचा बळी गेला आहे. म्हैसूर जिल्हय़ात शुक्रवारी 12 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी नंजनगूडमधील 10 जणांचा समावेश आहे. या सर्वांना येथील फार्मा कंपनीशी संबंध आहे. या जिल्हय़ातील रुग्णसंख्या 73 वर पोहोचली आहे.
बळ्ळारी जिल्हय़ातही 7 नवे रुग्ण आढळून आले असून येथील रुग्णसंख्या 13 वर पोहोचली आहे. हे सर्वजण होस्पेटच्या एस. आर. नगरमधील आहेत. यापूर्वी येथे एकाच कुटुंबातील 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर या कुटुंबातील 25 जणांना होस्पेटमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांच्यापैकी 7 जणांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळै एकाच कुटुंबातील 11 जण कोरोनाग्रस्त झाले आहेत.
मंडय़ा जिल्हय़ातील मळवळ्ळी येथील 25, 29 आणि 45 वर्षीय पुरुषांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच मंगळूर जिल्हय़ातील उप्पीनंगडी येथील 39 वर्षीय व्यक्ती 28 मार्च रोजी तबलिग जमातच्या कार्यक्रमात सहभागी होती. त्यालाही कोरोनाची बाधा झाली आहे. बिदरमध्येही 18 वर्षीय कोरोनाबाधित युवकाला तबलिगची पार्श्वभूमी आहे. चिक्कबळ्ळापूरमध्ये 20, 19 आणि 36 वर्षीय युवकाला 65 वर्षीय संसर्गबाधित वृद्धाच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाची लागण झाली आहे. हा वृद्ध तीन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याच्यावर बेंगळूरमध्ये उपचार सुरू आहेत.
बेंगळूर शहर जिल्हय़ात 10 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये 6 पुरुष तर 4 महिलांचा समावेश आहे. येथील 11 वर्षीय बालिका व 5 वर्षीय बालकाला त्यांच्या पालकांमुळे कोरोनाची लागण झाली आहे.
विजापूरमध्ये आणखी दोघे पॉझिटिव्ह
विजापूरमध्ये शुक्रवारी आणखी दोघांमध्ये कोरोनाचे विषाणू आढळले आहेत. त्यात 6 वर्षीय बालक आणि 28 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या दोघांना 60 वर्षीय वृद्धेच्या संपर्कात आल्यामुळे संसर्ग झाला आहे. ही वृद्धा 12 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. जिल्हा इस्पितळात आयसोलेशन वॉर्डामध्ये या तिघांवर उपचार केले जात आहेत. जिल्हय़ात आतापर्यंत 19 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी एका वृद्धाचा यापूर्वी मृत्यू झाला होता.