राज्यातील संसर्ग बाधितांची संख्या 232 वर : कोरोनाचा कहर सुरूच
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असून रविवारी सुमारे 17 पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची भर पडली. आरोग्य खात्याने सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या बुलेटीनद्वारे ही माहिती मिळाली आहे. त्यामध्ये विजापूरमधील 6 रुग्णांचा समावेश आहे. विजापूरमध्ये प्रथमच कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन हादरले आहे. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्हय़ातील रायबागमध्ये 3 आणि हिरेबागेवाडी येथे एक तसेच गुलबर्गा व बेंगळूर शहर जिल्हय़ात प्रत्येकी 3 आणि एक असे एकूण 17 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 232 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 54 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 6 जण मृत्यूमुखी पडले आहेत. त्याचप्रमाणे गुलबर्ग्यात तीन रुग्णांमध्ये दोन वर्षीय बालकाचाही समावेश आहे. बेंगळूर शहर जिल्हय़ात तीन नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे येथील रुग्ण संख्या 76 वर पोहोचली आहे. म्हैसूरमध्येही एक नवा रुग्ण आढळून आला असून तो नंजनगुड येथील जुबिलियंट फार्मा कंपनीचा कर्मचारी आहे. त्याचप्रमाणे रविवारी राज्यातील इस्पितळांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आलेले 131 जण दाखल झाले आहेत.