प्रतिनिधी/ पणजी
राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून गेल्या 24 तासात पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली. आगामी पाच दिवसात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पणजी वेधशाळेने व्यक्त केला आहे.
म्हापसा येथे जवळपास 3 इंच, सांखळी व वाळपईत 2.5 इंच, पेडणेत 1.5 इंच, जुने गोवे 1 इंच, पणजी, सांगे पाऊण इंच, काणकोण, मडगाव व मुरगाव प्रत्येकी अर्धा इंच एवढी पावसाची नोंद झाली. आगामी 5 दिवसात राज्यात जोरदार पाऊस पडेल त्याचबरोबर वादळी वाऱयाचा वेग ताशी 20 ते 35 कि.मी. असेल. आज बुधवारी गोव्यात मुसळधार पाऊस पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. मच्छीमारांनी या काळात खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. राज्याच्या किनारी भागात दि. 3 व 4 जुलै रोजी 4 मीटर उंचीच्या लाटा थडकतील अशी शक्यताही वेधशाळेने व्यक्त केली आहे. यंदाच्या मौसमात आतापर्यंत पडलेल्या पावसाची नोंद 42 इंच झाली आहे. सरासरीच्या तुलनेत 8 इंच पाऊस अधिक आहे.