सरासरी 13 इंच अधिक पाऊस : यंदा आतापर्यंत 30 इंचाची नोंद
प्रतिनिधी / पणजी
राज्यात गेल्या 24 तासात सरासरी 108 मि. मी. एवढी पावसाची नोंद झालेली आहे. पावसाची संततधार बुधवारी रात्री उशिरापर्यंत चालूच होती. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने विविध भागातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांत राज्यात मुसळधार पाऊस पडेल.
पणजीत 36 तासात 184 मि. मी. एवढी पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या तुलनेत यंदा आजच्या दिनी 13 इंच अधिक पाऊस झाला आहे. 17 जून रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंत राज्यात 30 इंच पावसाची नोंद झाली आहे. अद्याप जून संपण्यास एक डझन दिवस शिल्लक आहेत.
राज्यात पावसाने धरलेला जोर कायम आहे. मान्सून अधिक सक्रिय झालेला आहे. त्यामुळे आगामी 48 तासांत मुसळधार पाऊस पडत राहील, असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. पणजी वेधशाळेने सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार पावसाचा जोर पुढील 48 तास कायम राहिल. त्याचबरोबर जोरदार वारे वाहण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने झोडपले. त्यानंतर बुधवारी अधून मधून जोरदार सरी कोसळत होत्या. सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत पणजीत 42 मि. मी. पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत 13 इंच जादा पाऊस झालेला आहे. साधारणतः 30 जूनपर्यंत 30 ते 40 इंच पाऊस झालेला असतो. यावर्षी 17 जूनपर्यंत 30 इंच झालेला आहे. गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी अतिरिक्त पाऊस कोसळण्याची शक्यता यापूर्वीच हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
दुसऱया दिवशीही सर्वाधिक पाऊस जुने गोवेत
राज्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक 190 मि. मी. म्हणजेच 7.5 इंच पावसाची नोंद जुने गोवे येथे झाली आहे. सांखळीमध्ये 170 मि. मी. अशी पावसाची विक्रमी नोंद झालीय. म्हापसा 4.5 इंच, पेडणे 4 इंच, पणजी 6 इंच, वाळपई 5 इंच, काणकोण 5.5 इंच, दाबोळी 4 इंच, मडगाव 5.5 इंच, मुरगाव 4.5 इंच, केपे 5 इंच, सांगे 5.5 इंच एवढी पावसाची नोंद गेल्या 24 तासात झालेली आहे. जुने गोवेला मात्र पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले आहे.