कोरोना संसर्गबाधितांची संख्या 175 : आतापर्यंत 25 जणांना डिस्चार्ज
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 175 वर पोहोचली आहे. मंगळवारी देखील 12 नव्या रुग्णांची भर पडली. धक्कादायक बाब म्हणजे मंडय़ा आणि गदग जिल्हय़ांमध्ये प्रथमच कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. बागलकोटमध्ये आणखी दोन रुग्णांची भर पडली असून या जिल्हय़ातील रुग्णसंख्या 5 झाली आहे. त्यामुळे जिल्हय़ात हाय अलर्ट घोषित करण्यात आले आहे.
बेंगळूर शहर जिल्हय़ात 3, मंडय़ामध्ये 3, गुलबर्गा आणि बागलकोटमध्ये प्रत्येकी 2, बेंगळूर ग्रामीण आणि गदग जिल्हय़ात प्रत्येकी 1 रुग्ण मंगळवारी कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळला आहे. आतापर्यंत 25 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्त जिल्हय़ांमध्ये गदग आणि मंडय़ा जिल्हय़ाची भर पडली आहे. या जिल्हय़ांमध्ये 4 रुग्ण आढळले आहेत. गदगमध्ये 80 वर्षीय वृद्धेला कोरोनाची लागण झाली आहे. तर मंडय़ा येथे तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी होऊन परतलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या तिघांना संसर्ग झाला आहे. बेंगळूरमध्येही तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 29 वर्षीय युवक आणि 50 वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाली आहे. तर 68 वर्षीय वृद्धाला दुबई प्रवासादरम्यान संसर्ग झाला आहे. बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ात देखील तबलिग जमातच्या धार्मिक सभेत सहभागी झालेला 35 वर्षीय युवक पॉझिटिव्ह आढळून आला आहे. गुलबर्गा जिल्हय़ात आणखी दोन नवे रुग्ण आढळले आहेत. 28 वर्षीय महिला व 57 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत.