ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात 10 ते 13 मे या काळात पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मागील 24 तासात विदर्भातील काही भागात पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि गोव्यात हवामान कोरडे होते.
दक्षिण अंदमान समुद्र आणि नजीकच्या सुमात्रा किनाऱ्याजवळ चक्रवात स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात 13 मेपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. तर मध्य प्रदेशपासून विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात या आठवड्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे.
आज आणि उद्या (सोमवार) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. तर 12 आणि 13 मे रोजी राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडल्यास हवेत गारवा निर्माण होऊन असह्य उकाड्यातून नागरिकांची सुटका होणार आहे.