राज्य सरकारने कर वाढविलाचा परिणाम
प्रतिनिधी / पणजी
गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल – डिझेल या दोन्ही इंधनाचे दर सातत्याने वाढत असून आता गोवा सरकारने त्यावरील व्हॅट (कर) वाढवल्याने राज्यात पेट्रोल – डिझेलचे दर अनुक्रमे रु. 1.30 व 60 पैसे प्रति लिटरने वाढले आहेत. या वाढीव इंधन दराचा फटका आता सर्व वाहन चालकांना बसणार असून पेट्रोल – डिझेलसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
सरकारने एका अधिसूचनेद्वारे पेट्रोलवरील व्हॅट 2 टक्क्यांनी तर डिझेलवरील व्हॅट 1 टक्क्यांनी वाढवला आहे. त्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवरील व्हॅट 25 टक्क्यांवरुन 27 टक्क्यांवर नेण्यात आला असून डिझेलचा व्हॅट 22 टक्क्यांवरुन 23 टक्के करण्यात आला आहे. इंधन दरवाढीने महागाई वाढत असून आता गोव्यातील दरही व्हॅटमुळे वाढल्याने लोकांच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. महागाई – इंधन दरवाढीने जनता हैराण झाली असून व्हॅट वाढीचे पर्यावसान आणखी महागाई वाढण्यात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.