केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडून जनतेला दिवाळी भेट
- पेट्रोलवरील कर 35 टक्क्यांवरून 25.92 टक्क्यांवर
- डिझेलवरील कर 24 टक्क्यांवरून 14.34 टक्क्यांवर
प्रतिनिधी /बेंगळूर
केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही खूशखबर दिली असून पेट्रोल आणि डिझेलच्या करामध्ये मोठी कपात केली आहे. या दोन्ही इंधनावरील व्हॅट करात कपात करण्यासंबंधी सरकारने गुरुवारी अधिकृत आदेश दिला आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल सरासरी 100.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 85.03 रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करामध्ये कपात केल्यामुळे राज्यातील जनतेला दिवाळीची भेट मिळाली आहे. परिणामी, कर्नाटकात पेट्रोलचा दर 13.30 रुपये आणि डिझेलचा दर 19.47 रुपयांनी कमी होत आहे. हे नवे दर शुक्रवारपासून लागू होत आहेत.
केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 5 रुपये आणि 10 रुपये कमी केले होते. यापाठोपाठ मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्यातही या दोन्ही इंधनांच्या करामध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोलवरील कर 35 टक्क्यांवरून 25.92 टक्क्यांवर आणि डिझेलवरील कर 24 टक्क्यांवरून 14.34 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पेट्रोल 13.30 रुपयांनी आणि डिझेल 19.47 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने देशातील जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. शिवाय दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले. परिणामी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी सर्व राज्यांमधून होऊ लागली. अखेर केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी रात्री पेट्रोलचे दर प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 10 रुपयांनी स्वस्त केले आहेत. तसेच राज्यांना देखील विक्री करामध्ये कपात करण्याचे आवाहन केले आहे. केंद्राच्या आवाहनानंतर राज्य सरकारने याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
2,100 कोटी रुपये उत्पन्नात घट होणार
पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देत आहोत. कर्नाटक सरकारनेही पेट्रोल-डिझेलच्या करांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आपल्या सरकारला अंदाजे 2,100 कोटी रुपये उत्पन्नात घट होणार आहे, असे ट्विट मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केले आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर मागील 18 महिन्यांमध्ये अनुक्रमे 38.93 रुपये आणि 29.24 रुपयांनी वाढले होते. शिवाय मागील वर्षी पुड ऑईलच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतरही पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 20 रुपयांवरून 33 रुपयांपर्यंत वाढविण्यात आले होते.