रविवारी 130 जणांना कोरोनाची लागण : 75 टक्के बाधित मुंबईहून परतलेले : चिक्कबळ्ळापूरमध्ये सर्वाधिक 27 रग्ण
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटकात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून गेल्या 20 तासात राज्यात 97 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या दोन हजार पार करीत 2089 वर येऊन पोहोचली आहे.
आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमध्ये 130 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 75 टक्के बाधित मुंबईहून परतले आहेत. रविवारी चिक्कबळ्ळापूरमध्ये सर्वाधिक 27 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात भितीचे वातावरण पसरले आहे. बहुतेक सर्वजण मुंबईहून परतले असून सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले होते. स्वॅब तपासणी अहवाल जाहीर झाल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.
मंडय़ामध्ये 15, गुलबर्गा जिल्हय़ात 6, चिक्कबळ्ळापूरमध्ये 27, दावणगेरे 4, यादगिरी 24, हासन 14, बिदर 6, उडपी 23, उत्तर कन्नड 2, शिमोगा 2, तुमकूर 2, बेंगळूर शहर, विजापूर, दक्षिण कन्नड, धारवाड आणि कोडगू जिल्हय़ातील एकाला कोरोनाची लागण झाली आहे.
गेल्या एका महिन्यापासून रुग्ण न आढळलेल्या कोडगूमध्ये रविवारी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे परिसरात भिती निर्माण झाली आहे. मुंबईहून परतलेल्या व्यक्तीला ताप आल्याने उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. रविवारी सकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बेंगळुरात रविवारी एकाला कोरोनाची लागण झालेली आहे. आतापर्यंत बेंगळुरातील बाधितांची संख्या दोनशे पार झाली असून 10 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
तीन पोलिसांना बाधा
राज्यातील हासन, उडपी, कार्कळ येथील तिघा पोलिसांचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला आहे. कार्कळ ग्रामीण पोलीस स्थानकाचे हवालदार, आजेकारु पोलीस स्थानकाचे एएसआय आणि हासन पोलीस स्थानकातील हवालदाराला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलीस स्थानकच सीलडाऊन करण्यात आले आहे.