प्रतिनिधी / बेंगळूर
लॉकडाऊन परिस्थितीचा सर्वच क्षेत्रांना मोठय़ा प्रमाणात फटका बसला आहे. लॉकडाऊन कालावधीतही निर्बंध शिथिल असणाऱया वेळेत मद्यविक्री (केवळ पार्सल) करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. दरम्यान, राज्यात बियरविक्रीत 50 टक्के घट झाली आहे.
राज्यात 3,907 मद्य दुकाने, 232 क्लब, 1,037 हॉटेल्स, 3,552 बार ऍन्ड रेस्टॉरंट तसेच 438 एमएसआयएलसह एकूण 10,410 मद्यविक्रीची केंद्रे आहेत. नेहमीच्या दिवसांमध्ये राज्यात अंदाजे 70 हजार बियर बॉक्सची विक्री होते. यामुळे अबकारी खात्याला 10 कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र, यावेळी बियरविक्री 50 टक्क्यांनी घटली आहे. लॉकडाऊन कालावधीत दररोज 25 हजार ते 30 हजार बियरबॉक्स विक्री होत आहे.
दरवर्षी उन्हाळा कालावधीत बियरविक्रीच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे मद्यविक्रेत्यांनी अधिक भांडवल गुंतवून दुकाने, गोदामांमध्ये बियरसाठा केला होता. परंतु, लॉकडाऊनमुळे बार-रेस्टॉरंट, हॉटेल बंद असल्याने बियरसह मद्यविक्रीतही मोठी घट झाली आहे. बियरच्या तुलनेत इंडियन मेड लिकरला अधिक मागणी असल्याचे अबकारी खात्याच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे.