बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासन चिंता वाढत चालली आहे. तसेच कोरोनाची दुसरी लाट आल्यास सरकार कोरोनावर मात करण्यासाठी सज्ज आहे. यासाठी सरकारने तसे आदेशही जारी केले आहेत. राज्यात सोमवारी कोरोना रुग्णांची संख्या १,४०० च्या वर गेली होती. आता तीच संख्या मंगळवारी २ हजाराच्या पुढे गेली आहे.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात मंगळवारी २,०१० कोरोनाबाधितांची भर पडली. तर, मंगळवारी राज्यातील विविध जिल्ह्यातून ६७७ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. मंगळवारी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. वाढती कोरोना रुग्णांची संख्या राज्याची चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष असणार आहे.
दरम्यान राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. बेंगळूरमध्ये प्रशासन कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जिल्ह्यात प्रशासनाने अनेक कार्यक्रमांवर मर्यादा आणली आहे. दरम्यान मंगळवारी जिल्ह्यात १,२८० नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर ३९९ रुग्ण कोरोनावर मत करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,५५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.