मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा : पोलीस उपअधीक्षकांसाठी आयोजित प्रशिक्षणवर्गाचा समारोप
प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील गुन्हय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांनी झटावे. खास करून महिलांच्या सुरक्षेच्याबाबतीत गृहखात्याने नवनवीन उपाययोजनांचा शोध लावावा. सरकार सर्वतोपरी मदत करायला तयार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पोलीस उपअधीक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सात दिवशीय प्रशिक्षणवर्गाच्या समारोप सोहळय़ावेळी ते बोलत होते. राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी पिंक फोर्स स्थापन करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
तपासकामात गोवा पुढे
गुन्हा घडल्यानंतर पोलीस तपास करण्यास तत्पर असतात व यशस्वीपणे तपास करतात. गुन्हय़ाचा यशस्वी तपास लावण्यात गोवा इतर राज्यांपेक्षा पुढे आहे. गुन्हय़ांचा तपास पोलिसांनी यशस्वीपणे करावाच. पण त्याही पुढे जाऊन गुन्हे घडूच नयेत यासाठी पोलिसांनी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. पोलीस म्हणतील गुन्हा होण्यापासून कसा रोखू शकतो. गुन्हेगार काही पोलिसांना पूर्वकल्पना देऊन गुन्हे करीत नाहीत. तरीही गुन्हे होणार नाहीत याची सतर्कता बाळगल्यास गुन्हे घडण्यापासून रोखले जाऊ शकतात, असे ते म्हणाले.
गुन्हे रोखण्यावर संशोधन आवश्यक
गृह खाते सर्व मदत करण्यास तयार असून गुन्हे रोखण्यावर संशोधन झाले पाहिजे. नव्या-नव्या उपाययोजना पुढे आल्या पाहिजेत. आपण पोलीस महासंचालकांशी चर्चा केली आहे. खास करून महिलांविरुद्ध होणारे गुन्हे व महिलांच्या सुरक्षेसंबंधी हमी देणारी व्यवस्था करण्याची सूचना आपण पोलीस प्रमुखांना केली आहे. त्यासाठी लागणारा सर्वतो आधार सरकार देईल, असे ते म्हणाले.
पोलिसांसाठी योग्य ती साधनसुविधा, वाहने, प्रशिक्षण दिले जाईल, असे ते म्हणाले. महिलांसाठी खास महिला पोलीसस्थानक आहेच. त्याहीपुढे जाऊन महिलांच्या सुरक्षेसाठी खास पिंक फोर्स सरकार स्थापणार आहे. त्यात काय नवीन करावे याच्या सूचना आताच प्रशिक्षण घेतलेल्या उपअधीक्षकांनी कराव्यात. त्यांनी संशोधन करून उपाययोजना सूचवावी, असे ते म्हणाले.
जे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन काम करतात अशा पोलीस कॉन्स्टेबलना योग्य मार्गदर्शन व्हावे त्यासाठी पोलीस उपअधीक्षकांकडून मोठी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.