संस्थात्मक क्वारंटाईन रद्द : नियमात बदल : विदेश, परराज्यातून येणाऱयांना लागू
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना केल्या असून क्वारंटाईन नियमांमध्ये पुन्हा बदल केले आहेत. परराज्यातून किंवा विदेशातून कर्नाटकात येणाऱयांना यापुढे हॉटेल किंवा सरकारने निश्चित केलेल्या सरकारी क्वारंटाईन केंद्रांमध्ये दाखल होण्याची आवश्यकता नाही. सरकारने संस्थात्मक क्वारंटाईन रद्द केले असून 14 दिवस होम क्वारंटाईनचा आदेश सोमवारी जारी केला आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याने कोरोनासंबंधिच्या नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. यापूर्वी विदेश तसेच महाराष्ट्रासह परराज्यातून कर्नाटकात येणाऱयांना 7 दिवस संस्थात्मक आणि 7 दिवस होम क्वारंटाईन होण्याची सक्ती केली होती. आता संस्थात्मक क्वारंटाईन ऐवजी सरसकट 14 दिवस होम क्वारंटाईन होण्यासंबंधीची मार्गसूची राज्य सरकारने जारी केली आहे.
यापूर्वी 7 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन होताना येणारा खर्च हा स्वतः करावा लागत होता. या नियमामुळे अनेकांपुढे आर्थिक समस्या निर्माण होऊ लागली. दरम्यान, तज्ञांनी इस्पितळांमध्ये कोरोनाबाधितांवर उत्तम रितीने उपचार मिळावे याकडे अधिक लक्ष केंद्रीत करावे, परराज्य-विदेशातून येणाऱयांना घरातच क्वारंटाईन करून त्यांच्या संपर्कात राहून माहिती जमवावी, असे सल्ले दिले होते. त्यानुसार सोमवारी नवे नियम जारी करण्यात आले आहेत.