पणजी शिमगोत्सव समितीतर्फे 23 पासून विविध कार्यक्रम
प्रतिनिधी / पणजी
गोवा राज्यात सर्वत्र शहरातून, गावातून रंगोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे मनासारखा रंगोत्सव साजरा करण्यास मिळाला नव्हता. गोमंतकीय जनतेने त्याची भरपाई करीत काल शुक्रवारी मोठय़ा आनंदाने रंगोत्सव केला. पणजीतील आझाद मैदानावर पणजी शिमगोत्सव समितीतर्फे विविध गीतांवर ठेका धरत लोकांनी नाचत रंगोत्सवाचा आनंद लुटला.
पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, सांताक्रूझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस हे त्यात रंगून सहभागी झाले. मतभेद विसरून सर्वांनी एकत्र राहून पणजीचा विकास साधू या असे निवेदन त्यांनी करून लोकांना होळीच्या शुभेच्या दिल्या.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी देखील सदर रंगपंचमीत हजेरी लावून सहभाग दिला. लहान मुले, मुली, महिला, पुरुष तसेच तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांनी या रंगोत्सवात भाग घेतला. पणजी शिमगोत्सव समितीतर्फे 23 ते 26 मार्च पर्यत असे एकूण चार दिवस आझाद मैदानावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तत्पूर्वी सकाळी 9 वाजता पणजी महालक्ष्मी देवीच्या मंदिराकडून मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी महालक्ष्मी देवीला नमन करण्यात येऊन गाऱहाणे घालण्यात आले. तेथून वाजत गाजत मिरवणूक आझाद मैदानाकडे आल्यानंतर रंगोत्सवाचा कार्यक्रम सुरू झाला. हिंदी, मराठी, कोकणी गीतांच्या तालावर अनेकांनी नाचून आपली हौस भागवून घेतली.
पाटो-पणजी येथील सरकारी वसाहतीत रंगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. तेथे विविध स्पर्धा घेण्यात आल्या आणि गुरुवारी रात्री होळी दहनाचा कार्यक्रम करण्यात आला. वसाहतीमधील सर्व लोकांनी रंगोत्सवात भाग घेतला.