प्रतिनिधी/ पणजी
गोवा सरकार राज्यातील तमाम नागरिकांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. हेल्थ फॉर ऑल अर्थात सर्वांसाठी आरोग्य सेवा या अभियानांतर्गत लोकांना त्वरित आरोग्य सेवा मिळावी व डॉक्टरकडे येण्याची गरज पडू नये यासाठी टेली मेडिसीन सेवा लवकरच राज्यात सुरू केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी दिली. पणजी मतदारसंघातील रायबंदर येथे नव्या प्राथमिक आरोग्य केंद्र व वेलनेस सेवा केंद्र उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, आरोग्य खात्याचे इतर पदाधिकारी व डॉक्टर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यातील नागरिकांना कोरोनाच्या काळात असो किंवा पुढील काळामध्ये असो इस्पितळांमध्ये किंवा आरोग्य केंद्रामध्ये न येता घरबसल्या आरोग्य सल्ला देण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या संकल्पनेतून टेली मेडिसीन सेवा सुरू करण्यात येणार असून येत्या काही दिवसांमध्ये याची अंमलबजावणी होणार आहे. गोमंतकीयांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
रायबंदर येथील आरोग्य केंद्र लवकरात लवकर व्हावे यासाठी स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात यांनी प्रयत्न केल्याचे सांगून येथील स्थानिकांची मागणी या आरोग्य केंद्रामुळे पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. स्टेमी कार्डियाक आरोग्यसेवा चोवीस तास रायबंदर आरोग्यकेंद्रामध्ये उपलब्ध असून 108 रुग्णवाहिकाही 24 तास या आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध होणार आहे. एक डॉक्टर, परिचारिका, पॅरा मेडिकल स्टाफ उपलब्ध असून परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.