बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी प्रशासन यंत्रणा लढत असल्याने राज्यात लॉकडाऊन वाढविण्याबाबत चर्चा करीत असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी सांगितले. यावरून राज्यात लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री लॉकडाऊन वाढवण्याचा अंतिम निर्णय चर्चेनंतर घेणार आहेत.
राज्यात सध्या २४ मेपर्यंत राज्यात संपूर्ण लॉकडाऊन आहे. “आम्ही उद्या याविषयी चर्चा करू, आज रात्री मी मंत्र्यांनाही भेटणार आहे, आम्ही योग्य निर्णय घेऊ,” असे येडियुरप्पा यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
बेंगळूरमधील पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर म्हणाले, “अनेक मंत्री लॉकडाऊन वाढविण्यास सहमत आहेत. मुख्यमंत्रीही लॉकडाऊन वाढविण्याबाबत सकारात्मक आहेत आणि २२ किंवा २३ मे पर्यंत ते अंतिम निर्णय घेतील.”
कर्नाटक सरकारने सुरुवातीला २७ एप्रिलपासून १० दिवस “पूर्ण लाॅकडाऊन” करण्याची घोषणा केली होती, परंतु त्यानंतर कोविड प्रकरणे सातत्याने वाढत राहिल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १० मे ते २४ मे या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. आता आणखी लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.