प्रतिनिधी /पणजी
राज्यात दि. 4 डिसेंबरपर्यंत विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली. पूर्व अंदाजानुसार गोव्यात बहुतांश ठिकाणी सायंकाळी उशिरा पावसाने हजेरी लावली. बुधवारी देखील सत्तरी व डिचोली तालुक्यातील काही भागात मध्यम तथा हलका पाऊस झाला.
पावसाच्या तारखा दिवसेंदिवस वाढत असून डिसेंबर सुरू झाला तरी पाऊस चालूच असल्याने बागायतदार अडचणीत आलेले आहेत. यंदा काजू, आंबा, फणस सारे काही विसरा असा संदेश बागायतदारांनी दिलेला आहे. कधी नव्हे तो यावर्षी सप्टेंबर मध्येच आंब्याच्या झाडांना मोहोर सुरू झाला. मात्र जोरदार पावसाने तो कुजून गेला. ऑक्टोबरमध्ये देखील मोहोर सुरू झाला असता पावसामुळे तो नष्ट झाला. तर कित्येक झाडांना नोव्हेंबरमध्ये आलेला मोहोर देखील जोरदार पावसामुळे कुजून गेला. पावसाळा संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. मौसमात झालेल्या या बदलाने भविष्यातील नैसर्गिक संकटाची चाहूल लागली आहे.
पणजी वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार दि. 1 डिसेंबर हा पावसाचा अखेरचा दिवस होता. त्यानंतर पुढील चार दिवस कोरडे असतील. तथापि सायंकाळी जारी केलेल्या माहितीनुसार आता दि. 4 डिसेंबरपर्यंत राज्यात ढगाळ वातावरण तसेच विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जुने गोवे येथील फेस्त हे यंदा पावसाळय़ात होणार आहे.
मंगळवारी राज्यात सर्वत्र उशिरा पाऊस सुरू झाला. पेडणेमध्ये 1 इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा, पणजी, जुने गोवे, सांखळी, वाळपई, दाबोळी, सांगे या भागात 1 से. मी. पर्यंत पावसाची नोंद झाली. काणकोणात पाऊण इंच तर मडगावात जवळपास 1 इंच एवढा पाऊस झाला. केपे मध्ये सर्वाधिक 1 इंचापेक्षाही जादा पावसाची नोंद झाली. त्या परिसराला मंगळवारी रात्री उशिरा पावसाने झोडपून काढले.
आजही राज्यात सर्वत्र मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे.