प्रतिनिधी /पणजी
राज्यात उद्या शनिवारी व रविवारी सर्वत्र जोरदार पाऊस पडणार असून त्यानंतर हा पाऊस सातत्याने पडत राहील असा अंदाज आहे. मान्सून नव्याने फार सक्रिय झालेला आहे आणि पूर्वेकडून मोठय़ा प्रमाणात ढग पश्चिमेकडे सरकत आहेत. त्यातून गोव्यात आगामी 24 तासांत मध्यम तथा हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज पणजी वेधशाळेने व्यक्त केला. मात्र शनिवारी राज्यात सर्वत्रच पाऊस पडणार असून शनिवारी रात्री पाऊस जोर पकडणार आणि रविवारी सर्वत्र जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
गेल्या 24 तासांत दाबोळी, काणकोण, केपे, मडगाव व सांगे येथे प्रत्येकी 1 ते 1.50 इंच पाऊस पडला. सांखळी, वाळपई येथे प्रत्येकी अर्धा इंच, म्हापसा, पेडणे, पणजी येथे 1 से.मी. झाला.
दि. 4 ते 6 सप्टेंबर एलो वॉर्निंग
हवामान खात्याने दि. 4 ते 6 सप्टेंबर या दरम्यान एलो वॉर्निंग जारी केली आहे. या 3 दिवसात गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज सर्वत्र हलका ते मध्यम प्रमाणात पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर ताशी वाऱयाचा वेग 40 ते 60 कि.मी. असण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.