बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकार कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करत असून देशात तिसऱ्या टप्प्यात लसीकरण मोहीम सुरु आहे. दरम्यान कर्नाटकात सलग चौथ्या दिवशी कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. शनिवारी सलग चौथ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५०० च्या वर गेली. राज्यात शनिवारी ५८० रुग्णांची नोंद झाली.
दरम्यान राज्यात शनिवारी ५८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर राज्यातील विविध जिल्ह्यातून ३५५ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णायातून घरी परतले. तर ५ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६,५९४ इतकी आहे. तर राज्यात आतापर्यंत १२,३५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्याही बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. तसेच सध्या उपचारात असणारे सर्वाधिक रुग्णही बेंगळूरमध्येच आहेत. दरम्यान शनिवारी जिल्ह्यात ३६७ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर १८२ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या देखील ४,७७४ वर पोहोचली आहे. दरम्यान शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,४९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.