प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कहर माजविलेल्या कोरोनामुळे सोमवारी जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मागील 24 तासांत राज्यात 14 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तथापि, ग्रीन झोनमध्ये असलेल्या हासन जिल्हय़ात पहिला रुग्ण आढळून आला आहे. रविवारी शिमोग्यातही कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. मुंबई, राजस्थानमधील अजमेर आणि गुजरातमधील अहमदाबादवरून परतलेल्यांमुळे संसर्ग वाढण्याचा धोका आणखी वाढला आहे.
राज्यात सोमवारी रुग्णसंख्या 862 वर पोहोचली तर 6 जण संसर्गमुक्त झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 426 इतकी झाली आहे. तर 404 जणांवर विविध इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत. दावणगेरे येथे 3, बागलकोट, बिदर बेंगळूरमध्ये प्रत्येकी 2 गुलबर्गा, हावेरी, हासन आणि मंडय़ा जिल्हय़ांमध्ये प्रत्येकी 1 नवा रुग्ण आढळला आहे.
रोजगारानिमित्त मुंबईला गेलेले अनेक जण परतत असून सोमवारी हासनमध्ये एक 30 वर्षीय एक महिला आणि मंडय़ा येथे 38 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. मंडय़ा जिल्हय़ात याआधी मुंबईतून ट्रकने परतलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाली होती. मंडय़ा जिल्हय़ातील चन्नरायपट्टण तालुक्यातील के. आर. पेठ येथे 30 वर्षीय महिलेला क्वारंटाईन करण्यात आले होते. तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे.
बेंगळूरमध्ये 26 वर्षीय युवक आणि मुळाचा आंध्रप्रदेशातील अनंतपूर येथील 55 वर्षीय व्यक्तीला एकाच रुग्णामुळे संसर्ग झाला आहे. या दोघांवर बेंगळूरमध्येच उपचार केले जात आहेत. गुलबर्गा जिल्हय़ात 38 वर्षीय पुरुष, विजापूरमध्ये 20 वर्षीय युवती, हावेरी जिल्हय़ातील शिग्गाव येथे 26 वर्षीय युवक सोमवारी पॉझिटिव्ह आढळला आहे.
दावणगेरे आणि बिदरमध्ये देखील कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढतच आहे. सोमवारी दावणगेरे येथे 33 वर्षीय युवक, 30 वर्षीय महिला आणि 56 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याने आढळले. त्याचप्रमाणे बिदरमध्ये 50 वर्षीय पुरुष आणि 27 वर्षीय युवकाला एकाच व्यक्तीमुळे कोरोनाची लागण झाली आहे.