बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दुसऱ्या लाटेचा प्रसार वेगाने होत आहे. राज्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने बऱ्याच ठिकाणी उपचारासाठी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात कोरोना रुग्णांवर उपचार करताना ऑक्सिजनची कमतरता भासूनये यासाठी १२७ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेविरुद्ध लढा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी केला आहे.
“राज्यात १२७ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे. यामध्ये राज्य सरकारच्या निधीचा वापर करून ६२, केंद्राकडून २८, एनएचएआय २४ आणि सीएसआर अंतर्गत ११ आणि इतर परदेशातील दोन” असे एकूण १२७ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प असणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिली.