प्रतिनिधी / पणजी
कोरोना चाचणी व लसीकरण वाढवण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून त्यांच्या निर्देशाप्रमाणे गोव्यातही 11 ते 14 एप्रिल असे चार दिवस लसीकरण उत्सव करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमातून चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वरील माहिती देऊन पुढे सांगितले की, देशभरातील व राज्यातील कोरानाचा तपशील मोदीनी चर्चेत मांडला. 10 राज्यांमध्ये कोरोनाची लागण मोठय़ा प्रमाणात झाली असून लसीकरण – चाचणी वाढवणे यावरच भर देण्यास त्यांनी सांगितले आहे. गोव्यात ज्या ठिकाणी साधन- सुविधा उपलब्ध आहेत तेथे लसीकरण उत्सव करण्यात येणार असून त्याची यादी जाहीर केली जाणार आहे. 45 वर्षांवरील लोकांनी या उत्सवात सहभागी होऊन लस घ्यावी तसेच तेथील लोकप्रतिनिधीनी त्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. लॉकडाऊन हा उपाय – पर्याय नाही याची आठवण मोदींनी करुन दिली असून कोरोनाचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. त्यावरच लक्ष केंद्रीत करणार असून लोकांनी पालन केले तर कोरोना नियंत्रणात येऊ शकतो, असेही डॉ. सावंत म्हणाले.