मुख्यमंत्र्यांचे संकेत : पंतप्रधानांच्या निर्णयाशी कटिबद्ध
प्रतिनिधी/ बेंगळूर
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत नसली तरी रेड झोनमधील रुग्णांचा आलेख वाढताच आहे. त्यामुळे 15 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सोमवारी याबाबतचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेला आणखी काही दिवस गैरसोयींना सामोरे जावे लागणार आहे.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करताना राज्यातील कोरोना, रुग्णांवरील उपचारासंबंधीची आणि आर्थिक परिस्थितीसंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तेथील परिस्थितीची माहिती दिली आहे. इनेक राज्यांनी लॉकडाऊन 3 मे नंतरही जारी ठेवण्याचा कल व्यक्त केला आहे. काही क्षेत्रांना लॉकडाऊनपासून सूट देण्याबाबत पंतप्रधानांकडे विनंती केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तरी सुद्धा त्यांच्या निर्णयाशी आपण कटिबद्ध आहे, असे येडियुराप्पा म्हणाले.
सध्याच्या राज्यातील आर्थिक स्थितीची माहिती देताना येडियुराप्पा यांनी पंतप्रधानांना ग्रीन झोनमध्ये लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्याची विनंती केली आहे. गृहमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री, मंत्री व विविध खात्यातील अधिकाऱयांशी चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे ते म्हणाले.