लस आल्यानंतर लसीकरण मोहीम सुरू करणार : मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी / बेंगळूर
देशभरात शनिवार दि. 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास प्रारंभ होणार आहे. मात्र, इतर काही राज्यांप्रमाणेच कर्नाटकातही लसीचा तुटवडा असल्याने 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लसीसाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी स्वतः याविषयी माहिती दिली असून तिसऱया टप्प्यातील लसीकरणाला शनिवारपासून प्रारंभ होणे आवश्यक होते. मात्र, ऑर्डर दिलेला लसीचा साठा अजून आलेला नाही. हा साठा आल्यानंतर तत्काळ लस देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये शनिवारपासून तिसऱया टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार नाही. हे लसीकरण केव्हापासून सुरू होईल याविषयी सरकारने अद्याप स्पष्टपणे सांगितलेले नाही. सरकारच्या उच्चस्तरिय सूत्रांच्या माहितीनुसार मे महिन्याच्या चौथ्या आठवडय़ापासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास प्रारंभ होणार आहे. शनिवारपासून लस देण्यात येणार नसल्याने 18 ते 45 वयोगटातील कोणीही लसीकरण केंदांवर जाऊ नये, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केले आहे.
राज्य सरकारने सिरम इन्स्टिटय़ूटला 400 कोटी रुपये किमतीचे 1 कोटी कोव्हॅक्सिनचे डोस पाठवून देण्याचा आदेश दिला आहे. मात्र, त्या संस्थेकडून लस पुरवठय़ाविषयी अधिकृत माहिती न आल्याने शनिवारपासून 18 वर्षांवरील नागरिकांसाठी सुरू होणारे लसीकरण लांबणीवर गेले आहे. शक्य तितक्या लवकर लसीचे डोस मागविण्यात येतील. आपण भारत बायोटेक आणि रशियातील कंपनीशीही संपर्क साधला आहे. त्यांच्याकडूनही अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही, असे डॉ. सुधाकर यांनी स्पष्ट केले. लसीकरणाविषयी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री येडियुराप्पा म्हणाले, सध्या लसीचा पुरेसा साठा नसल्याने लसीकरण लांबणीवर टाकण्यात आले आहे.
आणखी 1 कोटी डोसची ऑर्डर देणार
राज्यात कोरोना नियंत्रणासाठी तिसऱया टप्प्यातील लसीकरण अभियान व्यापक प्रमाणात राबविण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. 18 ते 45 वर्षे वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यासंबंधी शुक्रवारी बेंगळूरमध्ये कोविड टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूटकडून आणखी 1 कोटी अतिरिक्त कोव्हिशिल्ड डोस प्रत्येकी 300 रुपयांना खरेदी करण्यास अनुमोदन देण्यात आले. यापूर्वी राज्य सरकारने सिरमकडे 1 कोटी डोसची ऑर्डर दिली होती. आता आणखी 1 कोटी अतिरिक्त डोस मागविण्यात येणार आहेत.
लसीसाठी नोंदणी सुरू ठेवावी
18 वर्षांवरील नागरिकांना सर्व सरकारी इस्पितळांमध्ये मोफत लस देण्यात येईल. को-विन पोर्टलवर लसीसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू ठेवता येईल. त्याचप्रमाणे 45 वर्षांवरील ज्या नागरिकांनी लस घेतली नाही. त्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी.
– डॉ. के. सुधाकर, आरोग्यमंत्री