कोरोनाबाधितांची संख्या 279 वर ः दोन दिवसांत मृतांचा आकडा दुप्पट ः 80 जण संसर्गमुक्त
प्रतिनिधी बेंगळूर :
कर्नाटकात कोरोनाचा प्रादूर्भाव आणखी वेगाने होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मागील 24 तासात राज्यात 19 नव्या रुग्णांची भर पडली तर दोघांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही रुग्ण बेळगाव आणि चिक्कबळ्ळापूरमधील आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 12 वर पोहोचली आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या 279 झाली आहे. आरोग्य खात्याने बुधवारी सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये या माहितीचा उल्लेख करण्यात आला आहे.
सोमवारी सायंकाळपासून ते मंगळवारी सायंकाळपर्यंतच्या 24 तासात राज्यात 4 रुग्ण कोरोनामुळे दगावले होते. आता त्यात आणखी दोघांची भर पडल्यामुळे दोन दिवसांत कोरोनाबाधित मृतांची संख्या दुप्पट झाली आहे. धक्कादायक म्हणजे म्हैसूर जिल्हय़ात 10 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 9 जण नंजनगूड शहरातील ज्युबिलीयंट फार्मा कंपनीतील कामगार आहेत. ही कंपनी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. जिल्हय़ात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी 47 रुग्ण हे या कंपनीतील आहेत.
राज्यात बुधवारी म्हैसूरमध्ये 10, विजापूरमध्ये 3, बेंगळूर आणि बागलकोटमध्ये प्रत्येकी 2, बेळगाव आणि गुलबर्ग्यात प्रत्येकी 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. गुलबर्ग्यात आढळलेला रुग्ण हा 1 वर्षाचा बालक आहे. तो एन्फ्लूएन्झा लाईक इलनेस (आयएलआय) रोगाने त्रस्त आहे. बुधवारी त्याचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. बेंगळूरमध्ये 59 वर्षीय पुरुष आणि 32 वर्षीय महिलेला देखील संसर्ग झाला आहे. 32 वर्षीय महिलेला मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 65 वर्षीय वृद्धामुळे संसर्ग झाला आहे. राज्यात 279 पैकी 80 जण संसर्गमुक्त झाले असून 12 जणांचा बळी गेला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण बेंगळूरमध्ये आहेत. येथे 71 रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ म्हैसूर (58) आणि बेळगाव (19) रुग्ण आढळून आले आहेत.