मृत विजापूर, बेंगळूर, गुलबर्ग्यातील : बळींची संख्या 9 वर : 11 नव्या रुग्णांची भर
प्रतिनिधी/ बेंगळूर
मागील 24 तासात कोरोनामुळे तिघांचा बळी केला आहे. हे रुग्ण विजापूर, बागलकोट आणि बेंगळूरमधील आहेत. तर 11 नवे रुग्ण आढळले असून कोरोना संसर्गबाधितांची संख्या 258 वर पोहोचली आहे. त्यापैकी 65 जण आता बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी सायंकाळपासून बुधवारी दुपारपर्यंत राज्यात 11 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यात बागलकोट आणि गुलबर्गा जिल्हय़ात प्रत्येकी 3, बेंगळूर शहर जिल्हय़ात 2, विजापूर, बेळगाव, चिक्कबळ्ळापूरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. विजापूर जिल्हय़ातील 69 वर्षीय वृद्धाचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. त्याला त्याच्या 60 वर्षीय पत्नीमुळे कोरोनाची लागण झाली होती. ही महिला 12 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह ठरली होती.
बेंगळूरमध्ये दोन नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून त्यापैकी 65 वर्षीय रुग्ण दगावला आहे. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्याला रविवारी बेंगळूरच्या राजीव गांधी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याच्या स्वॅबचा वैद्यकीय अहवाल मंगळवारी सायंकाळी आल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली होती, असे स्पष्ट झाले. शहरात कोरोगाग्रस्त आढळलेला 26 वर्षीय युवक 7 एप्रिल रोजी आपल्या पित्यासमवेत हिंदूपूर येथे दुचाकीवरून गेला होता.
गुलबर्ग्यात 55 वर्षीय इसम कोरोनाचा बळी ठरला आहे. त्याचप्रमाणे 3 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 35 वर्षीय महिला तिची 10 वर्षीय मुलगी आणि 51 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह ठरले आहेत. 35 वर्षीय महिला आणि तिची मुलगी ज्या रुग्णाच्या संपर्कात आले होते. तो रुग्ण 8 एप्रिल रोजी मृत झाला होता. तर 71 वर्षीय व्यक्तीला त्याच्या 55 वर्षीय भावामुळे संसर्ग झाला आहे. चिक्कबळ्ळापूरमध्ये 65 वर्षीय व्यक्तीला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. तो कोणाच्या संपर्कात होता, हे अद्याप समजलेले नाही.
बागलकोटमध्ये 12 जण कोरोनाचे रुग्ण
बागलकोटमध्ये मागील 24 तासात कोरोनाबाधित 3 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील रुग्णसंख्या 12 झाली आहे. जिल्हय़ात 3 एप्रिल रोजी आढळून आलेल्या 75 वर्षीय कोरोनाग्रस्त वृद्धामुळे आतापर्यंत पाच जणांना संसर्ग झाला आहे. त्याच्यामुळे बुधवारी शेजारच्या कुटुंबातील 39 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 43 वर्षीय पुरुष आणि 32 वर्षीय महिला हे देखील कोरोनाचे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना त्यांचा 4 वर्षीय मुलगा आणि शेजारील महिलेच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाची बाधा झाला आहे.