खाण आणि भू-विज्ञान मंत्री मुरुगेश निराणी यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
सामान्य आणि गरिबांना कमी दरात घरे बांधण्यासाठी मदत व्हावी, यासाठी राज्यात 30 एप्रिलपासून राज्यात मोफत वाळू धोरण जारी करण्यात येणार आहे. त्यानुसार 10 लाख रुपयांच्या आतील घरांच्या बांधकामासाठी 100 रुपयांत एक टन वाळू दिली जाणार आहे. बेकायदेशीर वाळू उपशावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशातून नवे वाळू धोरण जारी करण्यात येत आहे, अशी माहिती खाण आणि भू-विज्ञान मंत्री मुरुगेश निराणी यांनी दिली. यामुळे नूतन घर बांधणाऱयांना आनंदाची बातमी मिळाली आहे. गुलबर्गा येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री निराणी पुढे म्हणाले, जनसामान्यांना कमी दरात वाळू वितरीत करण्याचा सरकारचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे 30 एप्रिलपासून मोफत वाळू धोरण जारी केले जात आहे. मोफत वाळू धोरणसह 30 एप्रिल रोजी नवे वाळू धोरण जारी केले जाईल. यापूर्वीच नवे वाळू धोरण तयार असून देशातच हे धोरण आदर्श ठरणार आहे. याचबरोबर अन्य राज्यांनीही याच पद्धतीचे धोरण जारी करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
10 लाखांच्या आतील घरांच्या बांधकामासाठी केवळ 100 रुपयांत एक टन वाळू वितरीत करण्यात येणार आहे. ग्राम पंचायत व्याप्तित घरे बांधणाऱयांना या धोरणेचा फायदा होणार आहे.
चेकडॅम येथे वाळू उपसा करून बैलगाडीद्वारे वाळू वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. तसेच येत्या 17 एप्रिल रोजी होणाऱया पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारांचा मोठय़ा मतांच्या अंतराने विजय होणार आहे, असेही मंत्री निराणी यांनी सांगितले.