बेंगळूर : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येन झपाटय़ाने वाढ होत असून रविवारी दिवसभरात 4,553 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 2,060 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानुसार राज्यातील एकूण बाधितांची संख्या 10,15,155 इतकी झाली असून 9,63,419 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 39,092 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात मागील चोवीस तासांमध्ये 15 जणांचा बळी गेला आहे. एकूण मृतांची संख्या 12,625 वर पोहोचली आहे. तर 331 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत.
रविवारी बेंगळुरात सर्वाधिक 2,787 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 1,225 जण कोरोनामुक्त झाले आहेत. याचबरोबर म्हैसूर जिल्हय़ात 260, बळ्ळारी 93, बेंगळूर ग्रामीण 155, मंगळूर 83, धारवाड 100, हासन 104, गुलबर्गा 170, मंडय़ा 79, तुमकूर 107, उडुपी 73 आणि कारवार जिल्हय़ात 49 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात दिवसभरात 1,19,881 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 4,553 जण बाधित झाले आहेत.