मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात इंटरनेट कनेक्शन सुरळीत करण्याच्या उद्देशाने दूरसंचार धोरणानुसार राज्यात 62 नवे मोबाईल टॉवर उभारणार, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. पणजीत झालेल्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली आहे. दुसऱया टप्प्यात राज्यात मोबाईल टॉवरांची संख्या 138 पर्यंत पोचणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.
गोवा दूरसंचार साधन सुविधा 2020 धोरणानुसार पहिल्या टप्प्यात 62 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नव्याने उभारण्यात येणाऱया टॉवरर्समुळे राज्यात नेटवर्क कनेक्टिव्हीटी चांगली सुरळीत होणार असून त्याचा फायदा समाजातील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी तसेच आयटी व्यावसायिक इत्यादी होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
ऑगस्ट 2020 मध्ये गोवा सरकारने गोवा दूरसंचार साधनसुविधा धोरण 2020 अधिसूचित केले होते. राज्यात अत्याधुनिक दूरसंचार व इंटरनेट कनेक्शन मिळण्यासाठी साधनसुविधा तयार करणे हा त्यामागचा हेतू होता. जेणेकरुन राज्यातील प्रत्येक भागात चांगल्या प्रकारे इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.