प्रतिनिधी / बेंगळूर
केंद्र सरकारकडून राज्याला 15 लाखांपेक्षा अधिक कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अधिकाधिक लोकांना लस मिळण्यास मदत होणार आहे. राज्यात आतापर्यंत 46,02,000 जणांना लस देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
बेंगळुरात ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर राज्याला 15 लाखांपेक्षा अधिक लस मिळाले आहे. यातील 10 लाख डोस बेंगळूर आणि 5 लाख डोस बेळगावला पाठविले आहेत. कोरोना मार्गसूचीचे पालन केल्यास रुग्णसंख्येत आणखी घट होऊ शकते. आठ राज्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधून कठोर नियम जारी करण्याची सूचना केली आहेत, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कठोर नियम जारी करण्यात आले आहेत. कर्नाटकातही तशी परिस्थिती निर्माण होऊन नये. यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. आपण सरकारी, खासगी रुग्णालयांकडून उपलब्ध बेडबाबत माहिती घेतली असून आणखी एकदा चर्चा करणार आहे. मे महिन्यापर्यंत कठोर नियम जारी करणे आवश्यक असल्याचे कोविड तांत्रिक सल्लागार समितीने सांगितले आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
बेंगळुरात पुढील काही दिवसांत दिवसाला साडेसहा हजार रुग्ण आढळून येण्याची शक्यता आहे, असे तज्ञांनी सांगितले आहेत. संसर्ग नियंत्रणात न आल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल. विरोधी पक्षांचे सल्लेही आम्ही घेत आहोत. वेळ आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांना बोलावून चर्चा करू या, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. व्हिक्टोरिया, बौरींग रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी अतिरिक्त बेड राखीव ठेवणे गरजेचे आहे. खासगी रुग्णालयात 20 टक्के बेड राखीव ठेवण्याची सूचना केली आहे, असे त्यांनी सांगितले.