मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची पंतप्रधानांकडे विनंती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा भासत असल्याने लसीकरण केंद्रांवर येणाऱया नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हा मुद्दा प्रसिद्धी माध्यमांनी उचलून धरल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले असून कर्नाटकासाठी महिन्याला लसींचे 1.5 कोटी डोस वितरीत करावे, अशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी ही विनंती केली आहे.
राज्यात दिवसभरात कोरोनाचे नवे आढळून येण्याचा आकडा 1900 च्या खाली आला आहे. तर पॉझिटिव्हिटी दर 1.42 टक्क्यांपर्यंत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात लसींचा पुरवठा करावा. राज्यात आतापर्यंत लसीचे 2.62 कोटी डोस देण्यात आले आहेत. दररोज 5 लाख डोस याप्रमाणे महिन्याला दीड कोटी डोसची आवश्यकता आहे. इतक्या प्रमाणातील डोस त्वरित उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
कोरोना पॉझिटिव्हिटी दर, नव्या रुग्णांची संख्या आणि कोविड तांत्रिक सल्लागार समितीने दिलेल्या सल्ल्यानुसार निर्बंध घालण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांना देण्यात आली आहे. कोरोना नियंत्रणासंबंधी योग्य निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी हॉस्पिटल्समधील ऑक्सिजन, बेड्स तसेच पायाभूत सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. स्टाफ नर्स, प्रयोगशाळा कर्मचारी, वैद्यकीय कर्मचाऱयांची संख्याही वाढविण्यात आली आहे, अशी माहितीही येडियुराप्पांनी पंतप्रधान मोदी यांना दिली.