कुर हद्दीत गोवा बनावटीच्या दारुसह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर : कुर ता. भुदरगड गावच्या हद्दीत गोवा बनावटीच्या विदेशी दारुची वाहतूक करणारा एक माल वाहतूक कॅन्टर क्रमांक केए 25 सी 0701 गुरुवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास पकडला. 23 लाख 3 हजार 760 किंमतीच्या मद्यासह 32 लाख 8 हजार 760 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. वाहनचालक हरिश केशव गौडा वय 29, रा. कासुर, गौड, ता. होनावरा, जि. कारवार याला अटक केली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व गारगोटी पोलीस ठाण्याच्या संयुक्तपणे करण्यात आली, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक पाटील म्हणाले, कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावरून गोवा बनावटीच्या विदेशी दारुची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार पथकातील अधिकाऱ्यांनी कुर गावच्या बस स्थानक चौकात सापळा लावला. गुरुवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास मिळालेल्या माहितीप्रमाणे माल वाहतूक कॅन्टर वाहन येत असल्याचे दिसले. ते थांबवून वाहनात काय आहे, अशी विचारणा करून तपासणी केली. प्रथमदर्शी वाहनाचा हौदा पूर्णपणे रिकामा असल्याचे दिसून आले.
तरी देखील मिळालेल्या माहितीवरुन पथकातील कर्मचाऱ्यांनी वाहनाची कसून तपासणी केली. त्यावेळी हौद्यामध्ये वरती असलेल्या पत्र्याच्या प्लेटांची पाहणी केली असता चोर कप्पा असल्याचे दिसून आले. या पत्र्यांच्या प्लेटा काढल्यानंतर आतील कप्प्यात विविध ब्रॅंन्डचे गोवा बनावटीचे विदेशी दारु आढळून आली. यामध्ये रॉयल क्लासिक, मॅकडॉल क्र.1, रॉयल्स स्टॅग, इंपिरीयल ब्ल्यू, ब्लेंडर .प्लाईड विस्की तसेच गोल्ड ॲण्ड ब्लॅक रम या ब्रॅंडच्या 750 मिली क्षमतेच्या बाटल्या असलेले 361 बॉक्स मिळाले. बाजार भावानुसार त्याची 23 लाख 3 हजार 760 इतकी किंमत आहे.
या कारवाईत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे व जवान सचिन काळे, संदिप जानकर, सागर शिंदे, जय शिनगारे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कॉन्स्टेबल अजित वाडेकर, ओंकार परब, सुनील केंबळेकर, विजय तळस्कर, अमर वासुदेव, भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख, दयानंद देणके आदीनी भाग घेतला.