ऑनलाईन टीम / पणजी
गोवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.यावेळी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते फिल्ड आऊटरीच ब्युरोने आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ही करण्यात आले. यावेळी बोलताना भारताच्या सर्वोत्तम निवडणूक पद्धतीमुळे देशात लोकशाही रुजली असल्याचे राज्यपाल म्हणाले.
भारतीय निवडणूक आयोग आणि गोवा निवडणूक कार्यालयाने मतदार जागृतीसाठी हाती घेतलेल्या व्यापक कार्यक्रमांची राज्यपालांनी यावेळी प्रशंसा ही केली. याबरोबर गोवा निवडणूक कार्यालयाने विशेष आणि दिव्यांग मतदारांसाठी ब्रेल लिपीतून निवडणूक माहिती उपलब्ध करुन दिली आहे. तसेच कोविड-19 संक्रमण लक्षात घेऊन मतदान केंद्रांची रचना केली आहे, त्याचे राज्यपालांनी विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल म्हणाले की, यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिवसाची संकल्पना ‘सर्वसमावेशक, सुलभ आणि सर्वांचा सहभाग’ ही आहे. निवडणूक आयोगाने नुकताच ‘तुमचा उमेदवार जाणून घ्या’ या मोबाईल ऍपची निर्मिती केली आहे, त्याविषयी कुणाल यांनी माहिती दिली. या कार्यक्रमासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल, प्रभारी मुख्य सचिव पुनीत गोयल आणि राज्य निवडणूक आयुक्त वी.वी. रमनमूर्ती आदी. मान्यवर यावेळी उपस्थिती होते.