प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱयांनी शिक्षक मतदारसंघाचे आमदार अरुण शहापूर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना निवेदन सादर केले. निवेदनात विविध मागण्या केल्या आहेत.
निवेदनात, सातवा वेतन आयोग लागू करावा, एन.पी.एस. रद्द करून ओपीएस लागू करावे, 1995 नंतर सुरू झालेल्या शाळा-महाविद्यालयांना अनुदान द्यावे, सरकारी शाळा-महाविद्यालयांना मूलभूत सुविधा पोहचवाव्यात, खासगी आयटीआय कॉलेजसाठी बजेटमध्ये तरतूद करावी, शिक्षक-प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, कोरोनामुळे मृत झालेल्या सर्व शिक्षकांच्या व कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारची आर्थिक मदत द्यावी, विनाअनुदानित शिक्षकांना प्रशिक्षणासाठी निधीची तरतूद करावी, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी आमदार अरुण शहापूर यांच्यासह पदाधिकारी शिवानंद शिंधनकेरा, के. बाळकृष्ण भट, सुदिप बुद्दीहाळ, डी. के. ममता, चिदानंद पाटील, जे. एन. वासूकी, जे. एम. जोशी, एम गंगाधराचारी आदी उपस्थित होते.