प्रतिनिधी/ बेंगळूर
केंद्र सरकारपाठोपाठ कर्नाटक राज्य सरकारने देखील अनलॉक 5.0 मार्गसूची 30 नोव्हेंबरपर्यंत जारी केली आहे. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत लॉकडाऊन जारी राहणार आहे. राज्य सरकारचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर यांनी शुक्रवारी रात्री मार्गसूचीसंबंधी आदेश जारी केला आहे.
भारत सरकारच्या केंद्रीय गृहमंत्रालयाने 27 ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशानुसार अनलॉक 5.0 मार्गसूची 30 नोव्हेंबरपर्यंत जारी केली आहे. त्यानुसार राज्य सरकारनेही कर्नाटकातील प्रतिबंधित क्षेत्रांमधील लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून इतर क्षेत्रांसाठी कोणत्याही नव्या सवलती दिलेल्या नाहीत.
सदर मार्गसूचीनुसार नागरिकांना मास्कचा वापर करणे, दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे शारिरीक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर इत्यादी नियम पाळावे लागणार आहेत. कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही राज्य सरकारकडून करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.