प्रतिनिधी /बेंगळूर
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी राजीनामा देण्यापूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱयांना खूशखबर दिली आहे. त्यांनी सरकारी कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात 10.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. यासंबंधीचा अधिकृत आदेश सोमवारी जारी करण्यात आला. त्यामुळे सरकारी कर्मचाऱयांचा महागाई भत्ता 11.25 टक्क्यांवरून 21.50 टक्क्यांवर गेला आहे. 1 जुलैपासून भत्तावाढ लागू होणार आहे.
मागील आठवडय़ात येडियुराप्पा यांनी भत्तावाढीची सूचना वरिष्ठ अधिकाऱयांना दिली होती. याबाबत सोमवारी अधिकृतपणे आदेश देण्यात आला आहे. निवृत्त सरकारी कर्मचारी, सरकारचे अनुदान घेणाऱया संस्थांमधील कर्मचाऱयांनाही याचा लाभ मिळणार आहे.
कोरोना परिस्थितीमुळे मागील वर्षापासून कर्मचाऱयांचा भत्ता रोखून धरण्यात आला होता. आता भत्तावाढ जारी करण्यात आली आहे. याबरोबरच 1 जानेवारी 2020 पासून 30 जून 2021 पर्यंतच्या कालावधीतील महागाई भत्त्याचे हप्ते दिले जाणार आहेत.