मुंबई \ ऑनलाईन टीम
पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात अटकेत असलेल्या उद्योगपती आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई उच्च न्यायालयाने किंचितसा दिलासा दिला आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने २०२० मध्ये नोंदवलेल्या एफआयआर प्रकरणी राज कुंद्राला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं आहे. राजचा अटकपूर्व जामीन अर्ज २५ ऑगस्ट बुधवारपर्यंत सुनावणीसाठी राखून ठेवला आहे.
काही दिवसांपूर्वीच राज कुंद्राला अटक करण्यात आलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणाचा तपास करणाऱ्या क्राइम ब्रांचने विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. राज कुंद्रा या प्रकरणात मुख्य आरोपी असून यापुढे एसआयटी संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहे.
पॉर्नोग्राफी प्रकरणात सहभागी असणाऱ्यांची संख्या वाढत चालत असल्याने क्राइम ब्रांचने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. एसीपी दर्जाचा अधिकारी या तपासाचं नेतृत्व करणार असून आतापर्यंत दाखल सर्व गुन्ह्यांचा तपास केला जाणार आहे.